इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
कुलभूषण जाधवच्या शिक्षेला पाकिस्तानी मीडियानं 'अभूतपूर्व' घटना म्हटलंय... तर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या घटनेच्या दुष्परिणामांवर लक्ष वेधत आहेत.
पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयानं सुनावलेल्या या फैसल्यानंतर भारत-पाकिस्तानातील संबंध आणखी ताणणार आहेत... या शिक्षेनंतर परिणाम भोगण्यासाठी पाकिस्ताननं तयार राहावं, असा सूर आंतरराष्ट्रीय मीडियातून उमटतोय. सेनेच्या मीडिया शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, ही शिक्षा 'फिल्ड जनरल कोर्ट मार्शल'नं सुनावलीय आणि सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी याला दुजोरा दिलाय.
इंग्रजी वृत्तपत्र 'द नेशन'नं आपल्या पहिल्या पानावर 'डेथ टू स्पाय स्पाइक्स टेन्शन' (हेराला मृत्यूची शिक्षा तणाव वाढवतेय) असं शीर्षक दिलंय. सोमवारी एका सैन्य न्यायालयानं दोन्ही परमाणू संपन्न देशांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावात आणखी भर घालत हाय प्रोफाईल भारतीय हेराला मृत्यूची शिक्षा सुनावलीय, असं या बातमीत म्हटलं गेलंय.
सेनेनं जी शिक्षा दिलीय ती पाकिस्तानी कायद्यानुसार आहे... परंतु, ही शिक्षा दोन्ही देशांतील तणावाच्या परिस्थितीत भर घालेल, असं राजनैतिक तसंच संरक्षण तज्ज्ञ डॉ. हसन अस्करी यांनी या वर्तमानपत्राशी बोलताना म्हटलंय.