www.24taas.com, पॅरिस
इस्लामी कट्टरवादाला ट्युनिशियातील १९ वर्षीय अमिनाने टॉपलेस फोटो काढून आव्हान दिल्यावर आता जगभरातील मुस्लिम महिलांनी अमिनाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. पॅरिसमध्ये महिलांनी मशिदीसमोर अर्धनग्न अवस्थेत निदर्शन केलं.
अमिनाच्या समर्थनार्थ जगभरातील मिस्लिम महिला यापूर्वी आपले टॉपलेस फोटो फेसबुकवर ठेवू लागल्या होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर महिलांनी आंदोलन सुरू केले. महिलांच्या या आंदोलनाची तीव्रता वाढून जाळपोळीपर्यंत गेली होती. इजिप्त, तुर्कस्तान, ब्राझिल इत्यादी देशांमध्ये इस्लामी कट्टरवादाविरोधात घोषणा देत अनेक ठिकाणी रस्त्यावर महिलांनी जाळपोळ केली. पॅरिसमध्ये ग्रँड मस्जिद ऑफ पॅरिससमोर मुस्लिम महिलांनी टॉपलेस होत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं. मुस्लिम महिलांच्या आंदोलनामुळे इस्लामी कट्टरतावादी गटांवर दबाव येऊ लागला आहे.
काही दिवसांपूर्वी १९ वर्षीय अमिनाने आपला टॉपलेस फोटो प्रदर्शित केला होता. यात तिने आपल्या उघड्या वक्षावर इस्लामी कट्टरवादाला शिवी दिली होती. यानंतर तिचं अपहरण करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. याविरोधात जगभरातल्या मुस्लिम महिलांनी अमिनाला समर्थन देण्यासाठी आंदोलन सुरू केलं.