स्त्रीचा सर्वाधिक अपमान; त्यात भारत महान

भारतात महिलांना देण्यात येणारा दर्जा हा नेहमीच वादाचा विषय असतो. पण, आता विषयावर अभ्यास करून बोलणारे कमीच! लंडनमधल्या थॉमसन रॉयटर्स प्रतिष्ठाननं जगातील काही विकसित आणि विकसनशील अशा १९ देशांतील महिलांच्या स्थितीबद्दल एक सर्वेक्षण केलं. यामध्ये भारताला सर्वात शेवटचा म्हणजेच १९वा क्रमांक मिळालाय.

Updated: Jun 14, 2012, 04:15 PM IST

www.24taas.com, लंडन 

 

भारतात महिलांना देण्यात येणारा दर्जा हा नेहमीच वादाचा विषय असतो. पण, विषयावर अभ्यास करून बोलणारे कमीच! लंडनमधल्या थॉमसन रॉयटर्स प्रतिष्ठाननं याच विषयावर जगातील काही विकसित आणि विकसनशील अशा १९ देशांतील महिलांच्या स्थितीबद्दल एक सर्वेक्षण केलंय. यामध्ये भारताचा  क्रमांक आहे  १९वा... म्हणजेच सर्वात शेवटचा...

 

या सर्वेक्षणानुसार, देशातील महिलांची स्थिती ही सौदी अरेबियापेक्षा वाईट आहे. महिलांवरच्या लैंगिक अत्याचारामध्ये तर भारतानं पहिला नंबर मिळवलाय. भारत, ब्राझील, सौदी अरेबिया, मेक्सिको, इंडोनेशिया यांसहित १९ देशांचा या अभ्यासात  समावेश  करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, अत्याचार इत्यादी विषयांवर या १९ देशांमधल्या महिलांची तुलना करण्यात आली. या अभ्यासासाठी ३७० तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

 

महिलांना चांगला दर्जा देण्याच्या बाबतीत कॅनडा हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. तर जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या देशांना पहिल्या पाचात स्थान मिळालंय. अमेरिका हा देश सहाव्या क्रमांकावर आहे. तर नेहमीच पिछाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियालाही भारतानं याबाबतीत मागं टाकलंय. या सर्वेक्षणात सौदी अरेबिया १८व्या स्थानावर आहे तर भारत १९ व्या. सौदी अरेबियात महिलांना कार चालवणं, मतदान करणं हे मूलभूत अधिकारदेखील दिले गेलेले नाहीत. हे अधिकार भारतीय महिलांना असले तरी बाल विवाह, हुंड्याची प्रथा, घरगुती अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, आणि स्त्री-पुरुष भेदभाव यांसारख्या प्रश्नांमुळे भारताला शेवटचं स्थान मिळालंय.

 

भारतातील महिलांचा दर्जा त्यांची संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर अवलंबून असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलंय. तसंच महिलांवरील अत्याचार आणि शोषण याला समाजमान्यता असल्याचंही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं गेलंय. विकासाची भाषा करणाऱ्या कोणत्याही देशातल्या स्त्रियांची स्थिती इतकी वाईट नाही, असं सर्वेक्षणावरून दिसतंय.

 

.