समुद्र नाही चीनच्या बापाचा - भारताने फटकारले

दक्षिण चीनमधील समुद्र ही जगाची संपत्ती असून त्यास व्यापारासाठी मुक्त केले जावे, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटले आहे. दक्षिण चीनचा समुद्र कोणाची जागीर नाही, असे सडेतोड उत्तर कृष्णा यांनी चीनला दिले आहे.

Updated: Apr 6, 2012, 08:47 PM IST


www.24taas.com

 

दक्षिण चीनमधील समुद्र ही जगाची संपत्ती असून त्यास व्यापारासाठी मुक्त केले जावे, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटले आहे. दक्षिण चीनचा समुद्र कोणाची जागीर नाही, असे सडेतोड उत्तर कृष्णा यांनी चीनला दिले आहे. गुरूवारी चीनने भारताला धमकी दिली होती की, वादग्रस्त भागातून तेल काढण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.

 
दक्षिण चीन समुद्र ही जगाची संपत्ती असून या भागाचा वापर हा शेजारील राष्ट्रांमधील व्यापाराच्या दृष्टीने वाढ करण्यासाठी करण्यात यावा, असे नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना कृष्णा यांनी सांगितले. या सत्य परिस्थितीला आशियाई देश आणि चीनने देखील मान्य केले आहे. या क्षेत्राला मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

 

 

भारताच्या दक्षिण चीन समुद्रातील उपस्थितीमुळे चीन घाबरला आहे. तेल, गॅसचा शोध आणि या भागावरती आपला हक्क दाखवण्यासाठी दक्षिण चीन समुद्राचे भौगोलिक सर्वेक्षणाचे काम करण्याचे जाहीर केल्यानंतर आता चीनने या भागाला पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार असल्याची घोषणा केली आहे. याच बरोबर वादग्रस्त पॅरासेल बेटाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे योजना तयार केली आहे. चीनच्या या नव्या निर्णयावर  व्हिएतनाम आणि शेजारील देशांच्या संबंधात परत कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

चीन सरकारकडून ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ चीन’चे अध्यक्ष वू सिचून यांनी हा इशारा देताना म्हटले आहे की, चीन आपल्या समुद्री क्षेत्रात कोणाचेही सहकार्य घेऊ इच्छित नाही.  दक्षिण चीनमधील समुद्रापासून आपण दूर राहावे. या वादग्रस्त क्षेत्रातून भारताने तेलाचा उपसा केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

 

 

दक्षिण चीनमधील समुद्रात भारतीय तेल कंपनी ओएनजीसी आणि व्हिएतनामची तेल कंपनी संयुक्तरीत्या तेलउपसाचा प्रकल्प राबवित आहे. चीनने कंबोडियातील शिखर परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी संघटित राजकारण केले होते. मात्र, त्याला यश आले नव्हते. दक्षिण चीनमधील समुद्रातून तेल काढण्याच्या मुद्यावरून चीनने भारताला  पुन्हा धमकाविले. गेल्या काही दिवसांत चीन भारताला वारंवार धमकावत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.