भारताकडून म्यानमारला ५० कोटी डॉलरचं कर्ज

भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत.

Updated: May 28, 2012, 06:36 PM IST

www.24taas.com, नेपीतॉ, म्यानमार 

 

भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी म्यानमारचे राष्ट्रपती थीन सीन यांची भेट घेतली. यावेळी भारत म्यानमारला ५० कोटी डॉलर कर्ज म्हणून देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय. दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्यानं एक नव्या युगाचा आरंभ करत हवाई दलासहित वेगवेगळ्या क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य करण्याचा चंग बांधत एका करारावर सह्या केल्यात.

 

आज त्यांनी म्यानमारचे राष्ट्रपती थीन सीन यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भारत हा म्यानमारच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी कटीबद्ध असेल, असं म्हटलंय. यासाठीच भारतानं ५० कोटी रुपयांचं कर्ज म्यानमारला देऊ केलंय. भारताची आयात-निर्यात बँक तसचं म्यानमार विदेश व्यापार बँकेनंही याबद्दलच्या सहमतीपत्रावर सह्या केल्यात. मागच्या वर्षी म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्याच्या वेळी याबद्दल बोलणी झाली होती. दोन्ही देशांनी हवाईसेवा समझौता आणि संयुक्त व्यापार तसंच दोन्ही देशांच्या सीमेलगत सीमा व्यापार केंद्र स्थापन करण्याच्या मुद्यांवर सहमती दर्शविली आहे.

 

गेल्या २५ वर्षांत मनमोहन सिंग हे म्यानमारचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान ठरलेत.