फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्वॉईस् होलांद

फ्रेंच जनतेने रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्तांतराच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसऱ्या टप्यात झालेल्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलास सारकोझी यांचा सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार फ्रँक्वॉईस् होलांद यांनी पराभव केला.

Updated: May 7, 2012, 09:44 AM IST

www.24taas.com, पॅरीस 

 

फ्रेंच जनतेने रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्तांतराच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसऱ्या टप्यात झालेल्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलास सारकोझी यांचा सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार फ्रँक्वॉईस् होलांद यांनी पराभव केला. या निवडणुकीत होलांद यांना ५२ टक्के तर सारकोझी यांना ४८ टक्के मते मिळाली आहेत.

 

होलांद यांच्या रूपाने  दोन दशकानंतर, फ्रँक्वॉईस् मितरॉं यांच्यानंतर प्रथमच फ्रान्समध्ये सोशालिस्ट पक्षाचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे. फ्रान्समध्ये सोशलिस्ट पार्टीच्या उमेदवाराने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची १९९५ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. युरोपच्या राजकारणातील हा मोठा बदल मानला जात आहे. आपल्या प्रचारादरम्यान ओलाँद यांनी ‘मी नॉर्मल प्रेसिडेण्ट’ बनणार आहे, असं म्हटलं होतं. पण आता फ्रान्सची आर्थिक स्थिती नॉर्मल करण्याचं आव्हान त्यांना पेलायचं  आहे.

 

दरम्यान, रविवारी फ्रान्समध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान मोठय़ा उत्साहात पार पडले. फ्रेंच मतदारांनी कोसळणाऱ्या पावसांच्या सरींना न जुमानता मतदानाचा हक्क बजावला. होलांद यांनी टय़ूले येथे मतदान केले; तर सारकोझी यांनी पॅरिसमध्ये मतदान केले. यावेळी सारकोझी यांची पत्नी कार्ला ब्रूनीही उपस्थित होती.