प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या चेहर्यांना सौंदर्य प्रदान करून त्यावर हास्य फुलविणारा देवमाणूस पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित (८२) यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले.
डॉ. दीक्षित यांचा जन्म १३ डिसेंबर १९३० रोजी पंढरपूर (वर्धा) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही वर्ध्यात झाले. नागपुरातून १९५६ मध्ये त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली. १९५८ मध्ये लष्कराच्या वैद्यकीय विभागाची नोकरी सोडून अमेरिकेस उच्च शिक्षणासाठी गेले.
भारत सरकारने २00२ मध्ये पद्मश्री किताब देऊन त्यांच्या सेवेचा गौरव केला. महाराष्ट्रातील विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार बहाल केले. सामाजिक कार्याच्या ४२ वर्षांत त्यांनी २ लाख ५५ हजार शस्त्रक्रिया केल्या.
गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या व्यंगावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात त्यांनी नवी पहाट आणली. म्हणूनच त्यांना देवमाणूस म्हणूनच संबोधले जाई. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई असा परिवार आहे.