कुराण जाळल्याप्रकरणी ओबामांनी मागितली माफी

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

Updated: Feb 24, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, काबुल

 

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानात गेले तीन दिवस चालू असलेल्या आंदोलनामध्ये अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागातले एकूण १५ जण मृत्यू पावले आहेत. सुमारे तेवढेच लोक जखमीही झाले आहेत. पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीत हे लोक मृत्यूमुखी पडल्याचं सांगण्यात येत आहे.

काबूलपासून ५० किमी अंतरावर असणाऱ्या बगराम मधील अमेरिकन छावण्यांमध्ये मंगळवारी कुराणाच्या प्रती जाळल्याची बातमी समजल्यापासून अफगाणिस्तानात या घटनेविरोधात आंदोलनं सुरू झाली. नाटोने एक दिवस आधीच पाठवलेल्या कचऱ्याच्या ट्रकमध्ये कुराणाच्या प्रती होत्या. हा कचरा बगराम येथील एका खड्ड्यात जाळून टाकण्यात आला. यावेळी कचऱ्यात असणाऱ्या कुराणाच्या प्रतीही जाळण्यात आल्या. तेव्हापासून अफगाणिस्तानात याचा निषेध करण्यात आला.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. ही घटना जाणीवपूर्वक घडली नसल्याचंही त्यांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचं अश्वासनही त्यांनी दिलं आहे. करझाई यांनी अफगाणी नागरिकांनी शांतता राखावी असं अवाहन केलं आहे.