अमेरिकेतून ओबामांचा भारताला सल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सल्ला देताना विदेशी गुंतवणुकीसाठी दरबाजे बंद सल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या अनेक क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण नसल्याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

Updated: Jul 16, 2012, 09:47 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन   

 

केंद्रातील सरकारवर आता जगभरातून टीका होत आहे. त्यामुळे युपीए सरकार काही धडा घेईल का, अशी परिस्थिती असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सल्ला देताना विदेशी गुंतवणुकीसाठी दरबाजे बंद सल्याचे म्हटले आहे.

 

भारतात सध्या अनेक क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण नसल्याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. सध्याच्या बिकट अर्थव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी भारताने कठोर आर्थिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

 

या आधी ‘टाइम’ साप्ताहिकाने ‘कचखाऊ’ अशा शेलक्या विशेषणाने केलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या संभावनेची चर्चा अजून ताजी असतानाच आता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही मनमोहनसिंग सरकारचे कान टोचले आहेत़.  ओबामा यांनी रविवारी परकीय गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून मनमोहनसिंग सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढले.

 

परकीय गुंतवणुकीसंबंधीची भारतीय धोरणे अमेरिकेतील अनेक कंपन्यांसाठी मारक ठरत आहेत. किरकोळ तसेच अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांमधील व्यापारासाठी भारताने परदेशी कंपन्यांसाठी आपली दारे बंद केली आहेत. ही स्थिती गंभीर असून अमेरिकेतील एका मोठय़ा कंपनीने याबाबत आमच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. जगातील अनेक देशांना सध्या आर्थिक संकटाने घेरले आहे, भारताची अर्थव्यवस्थाही काहीशी अडचणीत आहे. यातून पूर्णपणे बाहेर पडायचे असेल तर त्यांनी कठोर आर्थिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे बराक ओबामा म्हणाले.

 

हा सल्ला देताना कोणत्या देशाने काय उपाययोजना कराव्यात हे आम्ही सांगू शकत नाही, त्यासाठी भारतीयांनाच पुढाकार घ्यावा लागेल. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणखी एका आर्थिक क्रांतीची या घडीला आवश्यकता आहे, अशी धारणा भारतीयांमध्ये सध्या वाढताना दिसत आहे, त्यामुळे अशा सुधारणा होणे अशक्य नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र या शेरेबाजीमुळे भारत दुखावला जाणार नाही, याची काळजीही ओबामा यांनी या वेळी घेतली.

काश्मीरबाबत पुनरुच्च्चार

जम्मू आणि काश्मीरचा वादग्रस्त प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेकडून तोडगा सुचवण्यात येण्याची शक्यता ओबामा यांनी फेटाळली. हा प्रश्न भारत आणि पाकिस्ताननेच सोडवावा, यासाठी अमेरिका अथवा अन्य देशांकडून कोणतीही उपाययोजना सुचवली जाणार नाही, या अमेरिकी धोरणाचाच ओबामा यांनी यावेळी पुनरुच्च्चार केला.

 

ओबामा यांची खरडपट्टी  

दरम्यान, व्होडाफोनसारख्या काही आंतरराष्ट्रीय ‘लॉबी’भारताबद्दल अपप्रचार करीत असून, ओबामा यांना भारतातील आर्थिक परिस्थितीची नीट कल्पना नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपनेही या टीकेबद्दल ओबामा यांच्यावर तोंडसुख घेतले.

 

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="140057"]