कांगारूंच्या पुन्हा धुलाईसाठी टीम इंडिया सज्ज!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहालीत तिसरी वन-डे खेळली जाणार आहे. जयपूर वन-डेमध्ये ज्याप्रमाणे कांगारुंच्या बॉलर्सची धुलाई केली होती तशीच धुलाई मोहाली वन-डेमध्येही भारतीय बॅट्समनने करावी अशीच इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2013, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मोहाली
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहालीत तिसरी वन-डे खेळली जाणार आहे. जयपूर वन-डेमध्ये ज्याप्रमाणे कांगारुंच्या बॉलर्सची धुलाई केली होती तशीच धुलाई मोहाली वन-डेमध्येही भारतीय बॅट्समनने करावी अशीच इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. तर ऑस्ट्रेलियासमोर आता पुन्हा चांगली कामगिरी करुन सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान असेल.
कांगारुंविरुद्धच्या वन-डे मोहिमेची सुरुवात पराभवाने करणा-या धोनी ब्रिगेडने जयपूरमध्ये ऑस्ट्रेलियाला चांगलाच दणका दिला. या दणक्यामुळे कांगारुंच्या गोटात चांगलीच घबराट पसरली असेल. टीम इंडियालादेखील आता मोहालीत होणा-या तिस-या वन-डेमध्ये आपली ही दहशत कायम राखावी लागेल. टीम इंडियाच्या बॅटिंग लाईन-अपच कडव आव्हान कांगारुंच्या बॉलर्ससमोर असेल.
शिखर धवन आणि रोहित शर्मा ही ओपनिंग जोडी लवकरात लवकर फोडण्यासाठी ऑसी बॉलर्सना खास रणनिती आखावी लागेल. तर जयपूरमध्ये कांगारुंची चांगलीच धुलाई करणा-या विराट कोहलीवर त्यांना काहीतर तोडगा काढवाच लागेल. याशिवाय रोहित शर्मा, सुरेश रैना आणि महेंद्र सिंग धोनीदेखील कांगारूंना वेसण घालण्यासाठी सज्ज असतील. तर लोकल बॉय युवराज सिंगने टी-२०प्रमाणे या वन-डेमध्येही तडाखेबंद बॅटिंग करावी अशीच इच्छा त्याचे फॅन्स बाळगून असतील.
दरम्यान पहिल्या दोन्ही वन-डेमध्ये फेल ठरलेले टीम इंडियाचे बॉलर्स धोनीचा घात करु शकतात. ईशांत शर्मा, विनय कुमार आणि भुवनेश्वर कुमारसमोर कांगारुंच्या युवा आणि टॅलेंटेड बॅटिंग लाईन-अपच कडव आव्हान असेल. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजालाही अद्यापपर्यंत सीरिजमध्ये आपल्या फिरकीची कमाल दाखवता आलेली नाही. भारतीय बॉलर्सने पुन्हा आत्मघातली बॉलिंग केली तर कॅप्टन जॉर्ज बेली आणि एरॉन फिंच या बॅट्समनकडून टीम इंडियाला चांगलाच धोका असेल. याशिवाय शेन वॉटसन, फिलिप ह्युजेस आणि ग्लेन मॅक्सवेलकडूनही भारताला सावध रहाव लागेल.
कांगारुंच्या बॉलिंग लाईन अप नजर टाकल्याच मिचेल जॉन्सन, क्लिन मकाया, जेम्स फॉल्कनर आणि शेन वॉटनसचा तेज मारा तर झेव्हियर डोहार्टी आणि ऍडम वोग्ज यांच्या फिरकीवर त्यांची भिस्त असेल. आता जयपूरप्रमाणे मोहालीत टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा विध्वंसक खेळी करतात की ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स आपल्या भेदक मा-यासमोर भारतीय बॅटिंग लाईन-अप उध्वस्थ करतात हे पहाण रंगतदार ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.