नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुप घोटाळ्यात दिग्गज क्रिकेटर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्याभोवती संशयाची सुई आली आहे. या कंपनीकडून 'लाभ' घेतल्याने हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पर्ल घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून या घोटाळ्याचं क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शनही समोर येऊ लागलं आहे. त्या अनुशंगाने कंपनीकडून फायदा मिळालेल्या या दोन्ही क्षेत्रातील 'लाभार्थीं'कडे अमंलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने सध्या मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत.
युवराज, हरभजनला मिळाले प्लॉट
पर्ल ग्रुपचा चेअरमन निर्मल सिंह भंगूसह अटकेत असलेल्या चार अधिकाऱ्यांच्या चौकशीत या घोटाळ्यातील मोठ्या प्रमाणात रक्कम व्हाया आयपीएल क्रिकेटपटू आणि सिनेकलाकारांवर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
या ग्रुपने हरभजन आणि युवराजला मोहालीत प्लॉटही बक्षिस म्हणून दिले होते तसेच ऑस्ट्रेलियात हॉटेल खरेदी करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी ब्रेट ली याला ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसिडर बनवण्यात आलं होतं, अशीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, युवराजची आई शबनम सिंह यांनी मात्र युवराजवरील आरोप फेटाळून लावले.
२०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पर्ल ग्रुपने प्लॉट बक्षिस म्हणून देऊ केला होता हे खरं असलं तरी हा प्लॉट आजपर्यंत युवराजला मिळालेला नाही. पर्ल ग्रुपशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयपीएलसह चार प्रीमियर लीगमध्ये पैसे
पर्ल ग्रुपने आयपीएलसह चार प्रीमियर लीगवर पैसा लावला होता. सुपर फाइट लीग, गोल्फ प्रीमियर लीग आणि कबड्डी सामन्यांमध्ये या ग्रुपचे पैसे होते. शिवाय, ग्रुपने तब्बल एक हजार उपकंपन्यांच्या माध्यमातून देशभरात जमिनींचे व्यवहार केले आहेत, असे तपासात स्पष्ट झाले आहे.