लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घेतला आहे. या सुट्ट्यांऐवजी शाळा आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना या दिवशी महापुरुषांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीदिनी झालेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली होती आणि आता दहा दिवसांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुट्ट्यांमुळे २२० दिवसांपैकी १२० दिवसच शाळा होते, असं आदित्यनाथ म्हणाले होते. उत्तर प्रदेशमध्ये सध्या असलेल्या ४२ सुट्ट्यांपैकी १७ सुट्ट्या या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या आहेत.