मोदी खरंच पंतप्रधान होतील का?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का?

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 13, 2013, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का? भाजपला सत्ता मिळवून देऊ शकतात का? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद आहे, हे उघड आहे. मोदींना प्रोजेक्ट केले तर भाजप आणि एनडीए मिळून 180 जागा जिंकू शकतात. पण मोदींना पुढे केले नाही तर भाजपला किमान 30 जागांवर नुकसान होऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये सांगण्यात आलेय.
मोदींना प्रोजेक्ट केले तर मध्य प्रदेशात किमान 24 जागा, गुजरातमध्ये 23 जागा आणि राजस्थानमध्ये 22 जागा भाजपला मिळू शकतील. उत्तर प्रदेशातील भाजपचे संख्याबळ 10 वरून वाढून 18 पर्यंत पोहोचू शकेल, असे सत्तेचे समीकरण आरएसएसच्या सर्व्हेत मांडण्यात आलंय. आरएसएसचे हे गणित मान्य केले तरीही सरकार बनवण्यासाठी 272 खासदारांचा आकडा गाठणे अजूनही अवघड आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला एनडीएचे घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने आणि शिरोमणी अकाली दलाने मान्यता दिलीय. परंतु तरीही दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी अन्य प्रादेशिक पक्षांची मदत घेणे एनडीएला भाग पडणार आहे. मोदींकडे प्रचारप्रमुखपदाची धुरा सोपवल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री, जेडीयूचे नेते नीतिश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतला आणि पहिला दणका दिला. आता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि ओरिसामध्ये नवीन पटनायक मोदींच्या बाजूने उभे राहणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्यांना कसे राजी करणार, यावर मोदींच्या राजकीय नेतृत्वाचा कस लागणार आहे.
भारतातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी जवळपास 156 जागांवर भाजपचे अजिबातच अस्तित्व नाही. उर्वरित 387 जांगावरच मोदींना आपला करिश्मा दाखवावा लागणार आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरिणाया, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरिसा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील या राज्यांमध्ये भाजपचे पाळंमुळं आहेत.
यापैकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप सरकारविरूद्ध अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. बिहारमध्ये जेडीयूशी युती तुटलीय, हिमाचलची सत्ता गमावलीय, कर्नाटकही हातातून गेलंय... अशा परिस्थितीत मोदी भाजपला सत्तेपर्यंत कसे पोहोचवणार, हा प्रश्नच आहे. 2009 मध्ये 110 लोकसभा जागांवर भाजपचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. या जागांचे परिणाम बदलण्याचा करिष्मा मोदी घडवू शकतील?
काँग्रेसचे विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार राहुल गांधी यांच्या तुलनेत सर्व सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींना जास्त पाठिंबा मिळतोय. पण तरीही भाजपला सत्तेच्या जवळ पोहोचवण्यात मोदींना यश मिळेल की नाही, ही शंकाच आहे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.