www.24taas.com, झी मीडिया, श्रीहरिकोटा
इस्रोनं आपल्या मोहीमेला `मंगळयान` असं सुटसुटीत नाव दिलंय. १३५० किलो वजनाच्या या उपग्रहावर पाच शास्त्रीय उपकरणं आहेत. ही उपकरणं नेमकी कशी आहेत आणि त्यांच्या मदतीनं मंगळाविषयी कोणती नवी माहिती मिळू शकते... पाहुयात...
आकाराला एखाद्या टेंपो-रिक्षापेक्षा थोडंसं मोठं दिसणारं हे ` मंगळयान` १३५० किलो वजनाचं आहे. यातल्या इंधनाचंच वजन तब्बल ८५० किलो आहे. उरलेला उपग्रह आणि उपकरणं यांचं मिळून वजन अंदाजे ५०० किलो आहे. १५ किलो वजन असलेली एकूण पाच शास्त्रीय उपकरणं यानावर आहेत.
लिमन अल्फा फोटोमीटर : हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. उपकरणाच्या मदतीनं मंगळाच्या वातावरणात असलेल्या हायड्रोजन अणूंचं अस्तित्व शोधण्यात येणार आहे. मंगळाच्या पृष्ठ भागावर कधीकाळी पाणी असेल, तर त्याचं अस्तित्व आजही हायड्रोजन अणूंच्या रुपानं तिथं दिसू शकेल.
मिथेन सेन्सर फॉर मार्स : या उपकरणामुळे मंगळावर मिथेन आहे का? असेल तर किती? याचा तपास केला जाणार आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यात मिथेनची भूमिका महत्त्वाची होती. त्यासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे. हा सेन्सर किंवा संवेदकाच्या मदतीनं मंगळावर कुठे आणि किती प्रमाणात मिथेन आहे याचा सविस्तर नकाशाच तयार होणार आहे. यामुळे पूर्वी तिथं कधी जीवसृष्टी होती का किंवा ती निर्माण होण्याची शक्यता आहे का, याबाबत अंदाज घेता येईल.
मार्स एक्सप्लोअर न्युट्रल कंपोझिशन अॅनालाईझर : या शास्त्रीय उपकरणाच्या सहाय्यानं मंगळाच्या वातावरणात असलेल्या इतर कणांची माहिती गोळा केली जाणार आहे. तिथल्या वातावरणात नेमके कोणती मूलद्रव्यं आहेत, हे यामुळे समजू शकेल.
थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर : हे आणखी एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण मंगळयानावर असेल. मंगळाच्या लाल जमिनीखाली कुठले खनिज पदार्थ किती प्रमाणात आहेत, याचा नकाशाच हा स्पेक्ट्रोमीटर तयार करेल.
मार्स कलर कॅमेरा : याच्या मदतीनं मंगळाची रंगीत छायाचित्रं घेतली जातील.
मंगळयान मोहीमेचा अंदाजे खर्च ४५० कोटी रुपये इतका आहे. मंगळयान हा उपग्रह मंगळाभोवती साधारणतः ३०० दिवस घिरट्या घालेल आणि भारतीयांसाठी आजवर केवळ पत्रिकेतच राहिलेल्या या लाल ग्रहाची जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे पाठवेल. इस्रो ही मंगळावर यशस्वी मोहीम करणारी जगातली केवळ चौथी अंतराळ संशोधन संस्था ठरेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.