काश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल

काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.

Updated: Oct 11, 2016, 12:19 PM IST
काश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल title=

श्रीनगर : काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.

रविवारी श्रीनगर बायपास रोडवर सैनिकांच्या एका गाडीला अपघात झाला होता. ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटून ही गाडी रोडवरून खाली उतरून समोर असलेल्या झाडाला जाऊन आदळली होती. 

या अपघातात गाडीचा चेंदामेंदा झाला. एक जवान मात्र या गाडीत अडकून पडला होता. आर्मीच्या जवानांनी या अडकलेल्या जवानाला सुखरूपरित्या काढण्याचा प्रयत्न केला... परंतु, त्यांना यश येत नव्हतं. 

अशावेळी, याच भागातील काही काश्मीरी तरुणांनी धावत येऊन त्यांची मदत केली. एका ट्रकच्या साहाय्यानं अपघातग्रस्त गाडी हलवत त्यांनी आत अडकलेल्या जवानाला बाहेर काढलं.

या घ व्हिडिओ जवळून जात असलेल्या काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हाच व्हिडिओ सध्या यूट्यूब आणि इतर सोशल वेबसाईटवर व्हायरल होताना दिसतोय. 

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या वातावरणात आत्तापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झालाय तर हजारांहून अधिक जण दुखापतग्रस्त झाल्याचं वृत्त आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये अनेक ठिकाणी मारहाणीचं वृत्त आहे. त्यात हा प्रसंग उल्लेखनीयच ठरलाय.