व्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या

मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे.

Updated: Jul 6, 2015, 05:57 PM IST
व्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या title=

भोपाळ: मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकानं आत्महत्या केल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. 

व्यापमंच्या माध्यमातून पोलीस दलात भरती झालेल्या अनामिका कुशवाह यांनी सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घोटाळ्याशी संबंधित तीन लोकांचा गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ माजली असून या मृत्यू सत्रामागे नेमकं काय दडलं आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर काल म्हणजेच रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ आज प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळं व्यापमं गैरव्यवहार प्रकरणात मृतांची संख्या आता २८ वर पोचली आहे. 
 
दरम्यान याप्रकरणावरून काँग्रसने भाजपावर हल्लाबोल करत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरत असून याप्रकरणी शिवराज सिंग यांची चौकशी का होत नाही असा सवालही काँग्रेसतर्फे विचारण्यात आला आहे. तसंच या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.