www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळातून व्ही. बालकृष्णन यांनी राजीनामा दिलाय. बालकृष्णन हे १९९१पासून इन्फोसिससोबत जोडलेले होते आणि कंपनीतील सध्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबूलाल यांच्या २०१५मध्ये होणाऱ्या निवृत्तीनंतर बालकृष्णन यांना कंपनीचे प्रमुख मानलं जात होतं.
इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांच्या परतण्यानंतर इन्फोसिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बालकृष्णन यांनी संचालक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ते ३१ डिसेंबरपासून कंपनीचे सदस्य असणार नाहीत. याआधी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेल्या सुब्रमण्यम गोपाराजू यांनीही काल राजीनामा दिला होता. त्यापूर्वी कंपनीचा अमेरिकेतला व्यवहार बघणारे अशोक वेमुरी यांनी ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता.
कंपनीनं यु. बी. प्रवीणराव आणि बायोकानच्या चेअरमन आणि व्यवस्थापन संचालक किरण मुजुमदार शॉ यांना स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी करुन घेण्याची घोषणा केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.