www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या महाप्रलयाला आज ३० दिवस पूर्ण झाले. हा महाप्रलय ज्यांनी अनुभवला त्यांच्या अंगावर अजूनही काटा येतोय... बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
‘बेपत्ता असलेल्यांपैकी केवळ उत्तराखंडचेच ९२४ जण आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मदतनिधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल’ असं बहुगुणा यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, इतर राज्यांतील मृतांसंबंधी माहिती संबंधित राज्यांना पाठविण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना एका शपथपत्रासोबतच आर्थिक मदतही ताबडतोब उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु, जर कुणी नंतर जिवंत आढळलं तर त्याच्या ही मदतीची रक्कम सरकारला परत करावी लागेल, असं बहुगुणा यांनी म्हटलंय.
१५ जून रोजी आलेल्या महाप्रलयानं इथं सगळंच उद्वस्त करून टाकलंय. उत्तराखंडच्या नुकसान झालेल्या भागाच्या पुनर्वसनाचा प्रश्नही गंभीर आहे. दरम्यान, या एक महिन्यात शोध न लागलेल्या या साडेपाच हजार लोकांना सरकार मृत घोषित करण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.