www.24taas.com, झी मीडिया,उत्तराखंड
उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.
उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव सुरुच आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झालेत. अतिवृष्टीच्या इशा-यामुळं हजारो पर्यटकांचं भवितव्य अजूनही धोक्यात आहे. उत्तराखंडमध्ये महाप्रलयाला आठवडा उलटून गेला तरी अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.
दरम्यान, २८ जूनपर्यंत पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अजूनही १५ हजार जण उत्तराखंडमध्ये अडकलेत. त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचं आव्हान या पथकासमोर आहे. आतापर्यंत ८० हजार भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
या जलप्रलयात हजारो जणांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण उत्तराखंडच या प्रलयात उद्धवस्त झालय. रस्तेच उद्धवस्त झाल्यानं, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरु असलेल्या मदतकार्यात आता पाऊस आणि खराब हवामानाचा अडथळा उभा ठाकलाय. यामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या सुमारे ६५०० पर्यटकांचा जीव अजूनही टांगणीला लागला आहे.. येत्या २ ते ३ दिवसांत उत्तराखंडात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिल्यानं, हेलिकॉप्टरद्वारे सुरु असलेलं बचावकार्य रडत खडत सुरु आहे.
या प्रतिकूल परिस्थितीतही राज्य सरकारची यंत्रणा आणि सैन्यदल आणि आयटीबीपीचं बचावकार्य जिद्दीनं सुरु आहे. केदारनाथमधील शोधमोहीम आणि मदतकार्य पीर्म झालं असून, आता केदारनाथ घाटीतील मदतकार्याला सुरुवात झालीय. याच भागात सर्वात मोठी हानी झाल्याची भीती मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी व्यक्त केली असून, हजारो जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तर दुसरीकडे बद्रीनाथ आणि रुद्रप्रयागमधील परिस्थिती अजूनही बिकट आहे. रुद्रप्रयाग ते गोचर आणि रुद्रप्रयाग ते श्रीनगर या मार्गावर रस्ताच वाहून गेल्यानं मदताक्रायत अडथळे निर्माण होतायेत. मात्र परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे.
आठवडाभराच्या मदतकार्यानंतर सुमारे एक लाख लोकांची सुखरुप सुटका केली असली तरी, या तांडवाचं वास्तव भीषण आहे. हजारो जणांचा मृत्यू झालाय, तर हजारो जण अजूनही बेपत्ता आहेत. हजारो घरं, अनेक गाव आणि लक्षावधी नागरिक या प्रलयात उद्धवस्त झाले आहेत. देवभूमी असा लौकिक असलेल्या उत्तराखंडच्या भूमीला पुन्हा सावरण्यासाठी काही वर्ष लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
झी २४ तासच्या बातमीनंतर महाराष्ट्र सरकारची टीम जोशी मठला पोहचली आहे. बद्रीनाथ तसंच परिसरात अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारची टीम इथं पोहचणं आवश्यक आहे, अशी बातमी झी २४ तासनं दाखवली होती. झी २४ तासच्या या बातमीनंतर राज्य सरकार जागं झालू असून त्यांची टीम आता जोशीमठला दाखल झाली आहे.
लष्कर, निमलष्करी दलं आणि वायुदल यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने उत्तराखंडमध्ये बचावकार्य वेगात सुरू आहे. खराब हवामानाचा फटका बसला तरीही हवामान अनुकूल झाल्यावर तातडीने वेगात हालचाली होतात आणि अडकलेल्या भाविकांना दिलासा दिला जातो.. हे संकट फक्त उत्तराखंडवर नाही तर संपूर्ण भारत देशावर आलंय, त्याचा मुकाबला केला पाहीजे ही जबाबदारी मानून प्रत्येक घटक कामाला लागलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.