पणजी : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव गोवा दौऱ्यावर आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना परखड भाष्य केले, दरवर्षी कशाला हवाय अर्थसंकल्प!
गेल्या वर्षीची आश्वासने अद्याप अपूर्ण आहेत. जर जनतेला दिलेली आश्वासने पूर्णच होत नाही तर मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय, यासाठी तुम्हाला बहुमत हवं आहे का, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.
विजय माल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांनी हजारो कोटी रूपयांची कर्ज बुडवली. देशाची तिजोरी रिकामी झाली, कर्जबुडवणाऱ्यांनी देशाला लुबाडले. या लोकांचं कर्ज सामान्य जनतेनं भरलेय. नोटाबंदीनंतर बँकेत पैसे आले ते सर्वसामान्य जनतेचे, असे उद्धव म्हणाले.
नोटाबंदीमुळे जनतेला सोसावी लागणारी झळ कधीही भरून निघणार नाही. या अर्थसंकल्पात ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न आयकरातून मुक्त करणे गरजेचं होते, तसे काहीही झालेले नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिक बँकांमध्ये एफडी ठेवत असतात त्यावर त्यांना जास्त व्याजदर देणे गरजेचे आहे, असे असताना ते करण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.