बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!

देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.

Updated: Oct 24, 2015, 03:51 PM IST
बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'! title=

अखिलेश हळवे, नागपूर : देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.

'निस्वार्थ मनानं देशसेवा करायचीय... मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील व्हा...' हे आवाहन नागपूरमध्ये संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांतल्या आकडेवारीवर नजर टाकली तर संघाला मिळणारी लोकमान्यता झपाट्यानं वाढत असल्याचं स्पष्ट होतं. 2012 पासून हा भरतीचा प्रवाह सुरु झाला. यंदा 2015 सालच्या जानेवारी ते जून या 6 महिन्यात 5,000 अर्जदारांनी संघाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा संघाच्या वेबसाईटवर दर्शवली. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी 5 हजार अर्ज आले असून, महिनाअखेरीस हा आकडा 10 हजारांच्या घरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

यात सर्वांत जास्त वाढ झालीय ती बिहारमध्ये... बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ संघ परिवाराचा सदस्य असलेल्या भाजपसाठी खूशखबरच आहे. बिहारमध्ये जानेवारी ते जून 2015 या काळात 278२ इच्छुकांनी संघकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यावर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 594 पर्यंत गेला. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ फक्त ऑनलाइनपुरती सीमित नसून संघाच्या शाखेत प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांची संख्या देखील वाढलीय. 

युवा पिढी संघाकडे आकर्षित होत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतंय. केंद्रात झालेल्या सत्तांतराचा हा परिणाम नसल्याचं संघातर्फे सांगितलं जातंय. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा संघाला होतोय, एवढं निश्चित. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.