इंदूर: मध्यप्रदेशमधील इंदूर इथं डॉक्टरांचा भोंगळ कारभार उघड करणारी घटना घडली आहे. खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचं सिझेरियन केल्यानंतर छोटा टॉवेल त्या महिलेच्या पोटातच राहून गेला होता.
तब्बल २० महिन्यानंतर हा टॉवेल त्या महिलेच्या पोटातून काढण्यात आला असून निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
काय घडलं नेमकं?
इंदूरमधील फरीदा नामक महिला १५ मार्च २०१३ रोजी खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. सिझेरियनद्वारे तिची प्रसूती झाली होती. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांचा लहान टॉवेल त्या महिलेच्या पोटात राहिला. यानंतर त्या महिलेनं डॉक्टरांकडे वारंवार पोटदुखीची तक्रारही केली मात्र तिची पोटदुखी कमी होत नव्हती.
अखेर गेल्या महिन्यात पिडीत महिलेनं दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिची सोनोग्राफी केली असता पोटात टॉवेल आढळून आला. नुकतीच या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करुन टॉवेल बाहेर काढण्यात आला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून मंगळवारी महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.