काश्मीर : जम्मू-काश्मीर सरकारने एका कथित अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलवामाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरेकी कारवायांमध्ये ठार झालेल्यांच्या 17 नातलगांची यादी काल जाहीर केली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा मारला गेलेला कमांडर बुरहान वानी याचा भाऊ खालिद वानीचाही समावेश आहे.
खालिद बुच्चूच्या जंगलांमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तोदेखील बुरहानसारखाच हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी असल्याचा लष्कराचा दावा त्याच्या नातलगांनी फेटाळला आहे. असं असलं तरी राज्य सरकारनं खालिदचं नाव यादीत टाकल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
सरकारने या यादीबाबत आक्षेप मागवले असून त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपानं खालिदच्या नावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसनंही यावर टीका केली आहे.