मुंबई, नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाच्या शरीरावर शंभर टाके पडले आहेत. मुंब्र्याची घटना ताजी असतानाच, अशीच एक ह्रद्यद्रावक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. एका भटक्या कुत्र्याने नबी करीम भागातील घरात घुसून तिस-या माळ्यावर झोपलेल्या लहान मुलीचे लचके तोडले. तर कुत्र्याच्या भांडणावरुन कोलकातामध्ये एकाचा जीव गेला.
मुंब्र्यातील अमृत नगर परिसरात राहणारा शाहीद नसीम सय्यद हा तिसरीत शिकणारा नऊ वर्षाचा मुलगा दोन भावांबरोबर शाळेत जात होता. यावेळी या परिसरात असणा-या आठ ते नऊ भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ प्रथम कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र तिथेही योग्य उपचार उपलब्ध नसल्याने कुटुंबियांनी त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविले. तिथे त्याच्यावर बुधवारी रात्री उशिरा प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
बेवारस आणि भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी स्थानिक महानगर पालिकेची असल्याचे सांगताना, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 9 वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याच्या प्रकरणात ठाणे महानगर पालिकेला जबाबदार ठरवले आहे. तसंच या संबंधी स्थानिक महानगर पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली असल्याचे सांगत, संबंधित मुलाच्या प्रकृती बद्दल रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी चर्चा केल्याचंही आव्हाड म्हणाले.
मुंब्र्यात कुत्र्याने 9 वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, अशीच एक ह्रद्यद्रावक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. एका भटक्या कुत्र्याने नबी करीम भागातील घरात घुसून तिस-या माळ्यावर झोपलेल्या लहान मुलीचे लचके तोडले. अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या लहान मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना, तिने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत कुत्र्याचा मृत्यु झाला. स्थानिक लोकांनी याआधी दिल्लीच्या एमसीडी विभागात भटक्या कुत्र्यांबाबत अनेकदा तक्रार केली होती. मात्र संबंधित विभागाने कारवाई करण्यास केलेल्या कुचराईमुळे नाहक एका लहान मुलीला आपल्या प्राणास मुकावं लागलं आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे एका श्वाननप्रेमीची त्याच्याच शेजा-याने हत्या केलीय. ही घटना कोलकातामध्ये घडलीय. बानेश्वर साऊ नावाचे 60 वर्षीय गृहस्थ कामावरुन घरी परतताना दररोज आपल्या भागातील कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालत असत. भटक्या कुत्र्यांना बानेश्वर खायला घालतात आणि हीच भटकी कुत्री भागातील लोकांना चावतात असा दावा त्यांच्याच शेजारी राहणा-या शंभू बाघ यांचा होता. त्यातूनच या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच रागाच्या भरात शंभूने बानेश्वर यांच्यावर रॉडने हल्ला केला.
त्यात बानेश्वर यांना जबर जखम झाली आणि त्यांचा करूण अंत झाला. पोलिसांनी शंभुला अटक केली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या विषयावरुन एका श्वान प्रेमीला नाहक आपला जीव गमवावा लागलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.