www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या पूर्ण देशाच्या आई असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद जिल्ह्यातील केंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार पी. शंकरराव यांनी सोनियांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या मंदिरात सोनिया गांधींची नऊ फूट उंच मूर्ती ठेवण्यात येणार आहे. या मूर्तीचं वजन 500 किलो असणार आहे. मूर्ती बनविण्याचं काम सोनियांच्या वाढदिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरपासून सुरू झालंय. `माँ तेलंगण`च्या धर्तीवर ही मूर्ती बनविण्यात येत असून ‘सोनियाम्मा’ नावानं मूर्तीचा हा फोटो आंध्रप्रदेशचा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालाय.
पी. शंकरराव हे स्वतंत्र तेलंगण राज्याचे समर्थक आहेत. काँग्रेसनं स्वतंत्र तेलंगण प्रदेश करण्याचा निर्णय घेतल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शंकरराव हे आंध्र प्रदेश विधानसभेत तीनवेळा मंत्रीही होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.