www.24taas.com, नवी दिल्ली
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर शनिवारी फाशी देण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू याला देण्यात आलेली फाशी ही कायद्यानुसारच होती, असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. अफझल गुरूला फाशी देण्यामागे कुठलंही राजकारण नसल्याचंही शिंदे म्हणाले. गुरूला फाशी देणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला ७ फेब्रुवारीलाच देण्यात आली होती. दुसऱ्या दुवशी ८ फेब्रुवारीला जम्मु- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी अफझल गुरूच्या फाशीसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अफझल गुरूला फाशी देण्यात आली, असं सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलं. फाशीनंतर अफझल गुरूला कारागृह परिसरातच धार्मिक विधींनुसार दफन करण्यात आलं होतं. अफझल गुरूच्या कुटुंबाने अफझल गुरूच्या मृतदेहाची मागणी केली आहे. या मागणीवर विचार करू असा इशाराही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे.
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने २००२ साली अफझल गुरूला फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा कायम ठेवली. शेवटी या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले असता सर्वोच्च न्यायालयाने गुरूची याचिका फेटाळून लावली. मात्र गुरूने शेवटचा उपाय म्हणून राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. १२ वर्षांनी ९ फेब्रुवारी २०१३ रोजी त्याला पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास फासावर लटकविण्यात आलं.