प्रक्षोभक विधानांवरून `राज-उद्धव`वर अडचणीत येणार?

ठाकरे बंधुंवर नेमकी काय कारवाई केली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह अशी विधानं केली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2013, 03:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ठाकरे बंधुंवर नेमकी काय कारवाई केली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह अशी विधानं केली होती.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात परप्रांतियांबाबत काही विधानं केली होती. त्यावर निवडणूक आयोगात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. यासंदर्भातचच न्यायालयानं हा प्रश्न विचारलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगानं नेमकी काय कारवाई केली, याचा तपशील देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

ठाकरे बंधुंनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांबद्दल सर्वोच्च न्यायलयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला ही नोटिस पाठवलीय. अॅडव्होकेट. ब्रिजेश कलापा यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं हे आदेश दिलेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबद्दल प्रक्षोभक उद्गार काढल्याचं कलापा यांनी याचिकेत नमूद केलंय. यासंबंधी सुनावणी करताना आर. एम. लोढा आणि ए. आर. दवे यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला दोघांवरील कारवाईबाबत विचारणा करणारी नोटिस पाठवली.