जम्मू-काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. याबाबत पंतप्रधान कार्यालयानं गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत.
जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला या फुटिरतावादी नेत्यांनी भेट नाकारली होती. यासिन मलिक वगळता एकही नेता खासदारांना भेटला नाही. त्यामुळे यापुढे या नेत्यांचे चोचले पुरवायचे नाहीत, या निर्णयावर केंद्र सरकार आल्याचं समजतंय. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंतप्रधानांची भेट घेऊऩ या दौऱ्याचा अहवाल सादर केला. तसंच आज संध्याकाळी सिंग यांच्या निवासस्थानी काश्मीरवर उच्चस्तरीय बैठक होणार असून त्याला अरूण जेटली, जितेंद्र सिंग, अमित शाह आदी उपस्थित राहणार आहेत.