मुंबई : तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो.
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) प्रमुख यू के सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजारात केलेली गुंतवणूक दीर्घकाळापासून वार्षिक १५ हून अधिक टक्के परतावा देत आहे. पण, सोन्यात केलेली गुंतवणूक मात्र १५ ते २० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ५-६ टक्केही परतावा देताना दिसत नाही.
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळतं कारण इक्विटीमध्ये गुंतवलेली रक्कम देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली जाते. घरगुती बचतीचा एक मोठा भाग इक्विटी बाजारात येणं सुरू झालंय, असंही सिन्हा यांनी म्हटलंय.
शिवाय, सोन्याच्या घसरलेल्या किंमतीही सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारात आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहीत करतील, असा विश्वासही सिन्हा यांना वाटतोय.
जे लोक आपला पैसा गुंतवण्यासाठी आणि दीर्घ काळासाठी पर्याय शोधत असतात ते आपला पैसा सोन्यात गुंतवणं सुरक्षित मानतात. पण, सोनं हा गुंतवणुकीचा केवळ छोटा भाग असू शकतो आणि आपला सगळा पैसा सोन्यात गुंतवला जाऊ नये, असंही सिन्हा यांनी सुचवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.