सुरत : सुरतमध्ये स्पाईस जेटचं विमान उड्डाण घेत असताना एका म्हैशीला ठोकलं. या आपघातात दीडशे लोक थोडक्यात बचावले. हे विमान सुरतहून दिल्लीला जात होतं.
स्पाइसजेट कंपनीच्या बोइंग ७३७ प्रवासी विमानाला म्हैशीने धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेची गंभीर दखल घेत देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेत.
ही घटना घडली त्यावेळी विमान दिल्लीच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी म्हैस विमानतळावर आली कशी, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावेळी सुरक्षा कोठे होती, असाही सवाल करण्यात आलाय.
स्पाइसजेट कंपनीने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. धावपट्टीवर पुरेसा प्रकाश होता मात्र आजूबाजूच्या मैदानात अंधार होता. या काळोखातून अचानक म्हैस वेगाने पुढे आली आणि विमानाला धडकली. सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि सुखरुप पर्यायी विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात आले, असे स्पाइसजेट कंपनीने स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.