www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी विमान कंपन्यांनी हा पुढाकार घेतला आहे. या कालावधीत विमान कंपन्यांकडे ग्राहकांची कमतरता असते. या स्पर्धेची सुरूवात स्पाइस जेटने केली. त्यानंतर या स्पर्धेत एअर इंडिया आणि इतर कंपन्यांनी उडी घेतली. एअर इंडियाच्या काही मार्गांवर १३५७ रुपयांपर्यंत भाडे कमी केले आहेत. ही सूट सुमारे ७० टक्के आहे. ट्रॅव्हल एजंटानुसार इंडिगो आणि गो एअर या दोन कंपन्यांनी आपल्या भाड्यात ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.
सध्या मुंबई ते दिल्ली याचे एकीकडील भाडे १० हजार रुपये आहे. तर दिल्ली गोवा याचे एकेकडेचे भाडे ६ हजार रुपये आहे. या भाड्यात आता प्रवासी सुमारे ५० टक्के बचत करू शकतात. एअर इंडियाने स्प्रिंग सेलमुळे ही सूट दिली आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ही योजना उद्यापासून २४ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असणार आहे. यात २१ फेब्रवारी ते १५ एप्रिल दरम्यान यात्रा करता येणार आहे. या योजनेत एअर इंडियाचे भाडे करासह १३५७ रुपयांपर्यंत कमी होईल. यात सर्व देशांतर्गत मार्ग समाविष्ट आहेत.
स्पाइस जेटने मूळ भाडे आणि इंधन अधिभार यात ५० टक्के कपातीची घोषणा केली आहे. अशीच घोषणा इंडिगो आणि गो एअर या कंपन्यांनीही केली आहे. दरम्यान दोन्ही कंपन्यांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. स्पाइस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा कालावधी ऑफ सीजन असतो आणि जगातील सर्व विमान कंपन्यांमध्ये अशी ऑफर दिली जाते.
ही ऑफर आजपासून २४ तारखेपर्यंत असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.