www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एका कंपनीचं सिमकार्ड ब्लॉक करण्यात आलं... त्यानंतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे नवीन सिमकार्ड इश्यु करण्यात आलं आणि याच नंबरच्या साहाय्यानं या कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल ३१ लाखांची रक्कम लंपास करण्यात आलीय.
ग्रेटर नोएडाच्या `इकोटेक - ३`मध्ये जपानची `निसिन एबीसी लॉजिस्टक प्रा. लि.` कंपनी आहे. या कंपनीचं अकाऊंट सेक्टर-१८ स्थित `आयसीआयसीआय` बँकेत आहे. या कंपनीचं अकाऊंट बऱ्याचदा इंटरनेट बँकिंगद्वारे वापरात आणलं जात होतं.
शुक्रवारी दुपारनंतर कंपनीचा रजिस्टर्ड मोबाईल अचानक बंद करण्यात आला. याबाबतीत, जेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला तेव्हा हा मोबाईल नंबर दुसऱ्याच कुणीतरी इश्यू केल्याचं समजलं. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेतून आणखी डिटेल्स माहिती घेतली पण एव्हाना ४५ वेळा ३१ लाख ४४ हजार रुपये काढण्यात आले होते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण आता नोएडाच्या सायबर सेलकडे सोपवण्यात आलंय. यामुळे, बँक आणि ग्राहक असलेली मोबाईल कंपनी यांचा बेजबाबदारपणा समोर आलाय.
सिमकार्ड ब्लॉक करताना आणि इश्यू करताना डॉक्युमेंट चेक करण्यात आलं नव्हतं. या प्रकरणात चोरट्यांनी चुकीचं मतदान कार्ड आणि फोटो वापरून सिमकार्ड विकत घेतलं होतं. दुसरीकडे, इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी वापरात येणारा यूजर आयडी आणि इतर डिटेल्ससाठी बँकही या प्रकरणात जबाबदार ठरतेय.
बँकिंग फ्रॉडमध्ये मोबाईल नंबर महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. या प्रकरणात चलाख चोरट्यांनी नवीन सिमकार्ड इश्यु करून पुढचा खेळ खेळलाय. सिमकार्ड इश्यु केल्यानंतर चोरटे ट्रान्झॅक्शन करायला गेले तेव्हा याच सिमकार्डवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) नंबर त्यांना मिळाला. त्यामुळे त्यांचं काम सहजसोपं झालं. या बँक खात्यातून ज्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले, त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.