www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात... राजकोटमध्ये जाऊन सोनियांनी प्रचारसभेत भाजपवपर जोरदार टीका केलीय. नरेंद्र मोदींनी केलेल्या परदेशी दौऱ्यांच्या खर्चाच्या आरोपांना त्यांनी उत्तर देणं मात्र त्यांनी मोठ्या शिताफीनं टाळलंय.
काँग्रेसनंच गुजरातच्या विकासाचा पाया रचल्याचं सांगत भाजप भ्रष्टाचारविरोधी नसून काँग्रेसविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. एनडीएच्या तुलनेत यूपीए सरकारनं गुजरातला ५० टक्के जास्त निधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातचा विकास हा राज्यातल्या जनतेच्या मेहनतीनं झाल्याचं सांगत त्यांनी नरेंद्र मोदींच्या ‘विकास पुरूष’च्या बिरूदावलीलाच आव्हान दिलंय. तसंच राज्यसभेत लोकपाल बिल केवळ भाजपमुळेच रखडल्याचंही यावेळी सोनियांनी म्हटलंय.
‘गुजरातमध्ये सर्वाधिक व्हॅट आकारला जातोय... काँग्रेसनं आपल्या राज्यांत अनुदानित किंमतीत नऊ सिलिंडर्सचा निर्णय लागू केलाय... गुजरातमध्ये नऊ सिलिंडर्सचा निर्णय का नाही?’ असा सवाल करत सोनियांनी मोदींविरोधात सर्वसामान्यांना साद घातली. गुजरातमध्ये महिलांचा पदोपदी अपमान होतो... इथं महिला सुरक्षित नाहीत, असं म्हणत सोनियांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केलीय.
सध्या तरी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा सामना सोनिया विरूद्ध मोदी असाच रंगताना पाहायला मिळतोय.