www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.
हॉटेलमध्येही त्यांच्यातील वादावादी सर्वांनी ऐकली होती, असं पोलीस चौकशीतून उघड झालंय. त्यामुळं आता या भांडणामागचं कारणच सुनंदा यांच्या मृत्यूचं कारण ठरलं असण्याची शक्यता व्यक्त होतेय.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, थरूर आणि सुनंदा तिरुअनंतपुरमहून दिल्लीला विमानानं जात असताना त्यांचं भांडण झालं होतं. विमानातील सर्व प्रवाशांनी ते पाहिलं होतं. यावेळी विमानात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारीही उपस्थित होते. ते मुंबईहून या विमानात बसले होते.
पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्यावरून शशी थरूर आणि सुनंदा यांच्या नात्यात दरार निर्माण झाल्याचं ट्विटरवरून जगासमोर आलं आहेच. अर्थात, नंतर या दाम्पत्यानं `हॅप्पीली मॅरीड`चं पत्र फेसबुकवर टाकलं होतं आणि सगळ्या चर्चांवर पडदा टाकला होता.
अर्थात, सुनंदा यांच्या मनात त्यानंतरही राग खदखदत होता. म्हणूनच त्यांनी टर्मिनल- ३ वरच्या वॉशरुममध्ये स्वतःला बंद करून घेतलं. शशी थरूर बाहेरून त्यांना विनवत होते. परंतु, त्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी थरूर रागातच निघून गेले. त्यानंतर सुनंदा बाहेर आल्या आणि मग या दोघांमध्ये काहीतरी संवाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघंही लीला हॉटेलमध्ये राहायला गेले.
घरी रंगकाम सुरू असल्यानं ते इथं आले होते. परंतु, तिथेही या दोघांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्याचं हॉटेलमधील स्टाफनं पोलिसांना सांगितलं. त्यांच्यातील भांडण अगदी खोलीबाहेरही ऐकू येत होतं. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावरच्या जखमा या वादावादीदरम्यानच झालेल्या नाहीत ना, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनं त्यांनी सखोल तपासही सुरू केलाय. त्यातून आता काय समोर येतं, यावर बरंच काही ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.