नवी दिल्ली : दक्षिण भारतीय महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शरद यादवांची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय.
दक्षिण भारतातील महिलाविषयी आक्षेपार्ह विधान करून जेडीयूचे नेते शरद यादव यांनी वाद निर्माण केला आहे. तसंच याप्रकरणी माफी मागण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. याउलट या विधानावरून आक्रमक झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
शरद यादव यांनी विचार करून वक्तव्य करावीत. महिलांच्या रंगाविषयी कुठलंही विधान करता कामा नये, असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सुनावलं असता शरद यादव यांनी 'मैं जानता हूं कि तुम क्या हो' असं वक्तव्य केलं.
शुक्रवारी राज्यसभेत शरद यादव यांनी दक्षिण भारतीय महिलांच्या वर्णावरुन आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानात काहीच चूक नसल्याचं म्हणत माफी मागण्यासही शरद यादव यांनी स्पष्ट नकार दिला आहे. विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचं शरद यादव यांनी सांगितलं.
मात्र एका विधाना़चा वाद सुरू असतानांच शरद यादव यांनी दुसरं वक्तव्य करून आणखी एक वाद निर्माण केला आहे.