अमेरिकेतल्या नोकरीवर पाणी सोडून गावच्या विकासासाठी झटतोय हा 'यंग गांधी'!

अमेरिकेची २ लाख प्रति महिना पगाराची नोकरी बाजुला सारत तामिळनाडूचा 'यंग गांधी' आपल्या गावाच्या सेवेत रुजू झालाय. 

Updated: Feb 10, 2016, 05:06 PM IST
अमेरिकेतल्या नोकरीवर पाणी सोडून गावच्या विकासासाठी झटतोय हा 'यंग गांधी'! title=

तामिळनाडू : अमेरिकेची २ लाख प्रति महिना पगाराची नोकरी बाजुला सारत तामिळनाडूचा 'यंग गांधी' आपल्या गावाच्या सेवेत रुजू झालाय. 

तामिळनाडूच्या थेनुर गावात राहणाऱ्या या युवकाचं नाव आहे सेंथिल गोपालन... 'यंग गांधी' ही उपाधी त्याला लोकांनीच प्रदान केलीय. 
  
अमेरिकेतून आपल्या गावात परतलेल्या सेंथिलनं आपल्या गावात जे बदल केलेत ते केवळ कौतुकास्पद आहेत. 

सेंथिलचं शिक्षण

सेंथिलनं त्रिचीमधल्या एका शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पदवी घेतल्यानंतर त्यानं बंगळुरूमध्ये काही वर्ष कॉर्पोरेट जगात काम केलं. त्यानंतर त्याला १९९९ मध्ये अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. 

अमेरिकेतून तामिळनाडूत परतण्याचा निर्णय जेव्हा त्यानं घेतला तेव्हा तो एका मोठ्या कंपनीच्या एका नव्या बिझनेस इनिशिएटिव्हचा प्रमुख पदावर कार्यरत होता. 

साधी राहणी उच्च विचारसरणी

१९९९ पासून २००४ पर्यंत सेंथिलनं आपल्या गाठिशी इतके पैसे जोडले होते की त्यातून तो आपलं आयष्य तामिळनाडूमध्ये आरामात काढलं असतं. 

पण, भारतात परतल्यानंतर सेंथिलनं २००५ साली 'पयिर' नावाची एक एनजीओ स्थापन केली. थेंनुर आणि आजुबाजुच्या गावाचा आणि मुलांचा विकास हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. 

गावाचं कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर

गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी सेंथिलनं त्यांनाच हाताशी धरून लोकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सोबतच, कमी खर्चात औषध आणि उपाययोजनाही मिळतील, याची तजवीज केली. 

अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा

सेंथिलनं आपल्या गावात नर्सरी आणि प्रायमरी शाळेची सुरूवात केली. यामध्ये त्यानं अशा मुलांनाही येण्यास प्रोत्साहन दिलं ज्यांनी लहान वयातच, अर्धवट शिक्षण सोडलं होतं. या शाळेत सध्या ५० विद्यार्थी आणि पाच शिक्षक आहेत. 

सेंथिलच्या 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' विचारधारेमुळेच त्याला गावकऱ्यांनी 'यंग गांधी' संबोधायला सुरुवात केलीय. गावातील लोकांना शहरांप्रमाणेच रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण व्हायला हव्यात, असं सेंथिल म्हणतो. त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू आहेत.