बंगळुरू : पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्ये प्रकरणी स्कॉटलँड यार्डने अतिशय महत्वाची माहिती दिली
या तीनही पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यासाठी एकाच पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचं स्कॉटलंड यार्डने म्हटलं आहे. याबाबतीत अहवाल सादर केल्याची माहिती कर्नाटक सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बंगळुरातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल सीबीआयने स्कॉटलंड यार्डला पाठविला होता. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून ७.६५ एम.एम. देशी पिस्तुलातून एकाच प्रकारे तिघांची हत्या झाल्याचा अंदाज स्कॉटलंड यार्डने व्यक्त केला. डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे आहे.
गोळ्या झाडल्यानंतर झालेली जखम आणि इतर तपासावरून तिघांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाद्वारे करण्यात आल्याचे बंगळुरातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीने अहवालात नमूद केले आहे. तिन्ही हत्यांमध्ये २.६५ एम.एम. देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या.
वीरेंद्र तावडेला चौकशीसाठी ताब्यात देण्याची मागणी सीआयडी पोलिसांनी सीबीआयकडे केली होती; मात्र अजूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळविले आहे. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असणारा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.