www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.
गोवा परिवर्तन मंचानं या प्रकरणी कागदपत्रांसह पत्रकार परिषदेत ही माहिती उघड केलीय. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप मंचान केलाय. यामागं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी परिवर्तन मंचातर्फे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांच्याकडे देण्यात आलीये.
पाहुयात या यादीत कोणाकोणाची नावं आहेत
अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मनोहर पर्रीकर अमिर खान, कपिल देव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराजसिंग
गोव्यातील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, गोव्यातील मनरेगाच्या लाभार्थ्यांमध्ये अनेक मान्यवर सिने कलावंत आणि तेवढेच मान्यवर क्रिकेटपटू यांचाही समावेश असल्याचं उघड झालं.
मागे युती सरकारच्या काळातील झुणका-भाकर योजनेमध्येही गावोगावच्या झुणका भाकर केंद्रात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर किंवा अनेक चित्रपट तारे जेवून गेल्याच्या नोंदी सापडायच्या. जितकी माणसे जेवून गेली तेवढं अनुदान या योजनेत सरकारकडून मिळायचं. म्हणजेच झुणका भाकर केंद्र प्रत्यक्षात हे एक हॉटेल असलं तरी तिथे कागदावर मात्र अनेकजण जेवून जायचे.
गोव्यातील मनरेगाच्या लाभार्थ्यांमध्ये अमिताभ बच्चन शिवाय अमीर खान, कपिल देव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह यांचाही समावेश आहे. या योजनेतील निर्देशानुसार या कलावंत सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांची नावेही या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये समाविष्ट आहेत.
गोव्यात मनरेगाची अंमलबजावणी करणाऱ्या गोवा ग्रामीण विकास संस्थेकडून गोवा परिवर्तन मंच या स्वयंसेवी संस्थेने माहितीच्या अधिकारात मनरेगाच्या लाभार्थ्यांची यादी मागितल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
या अनेक मान्यवर कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या नावाने तयार झालेल्या जॉबकार्डचा पगार मधल्यामध्ये हडप केला जायचा. मनरेगा योजनेत वर्षातील 150 दिवस दररोज 100 रूपये याप्रमाणे रोजगार किंवा तेवढे पैसे दिले जातात. हे सर्व पैसे बोगस लाभार्थी दाखवून उकळण्यात येत होते.
माहितीच्या अधिकारात मनरेगाच्या बोगस लाभार्थ्यांचा घोटाळा उघड केल्यानंतर गोवा परिवर्तन मंचचे प्रमुख यतीश नाईक यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केलीय. मनरेगाचा हा घोटाळा माहितीच्या अधिकारात उघड झाला त्यापेक्षाही खूप मोठा असल्याचा दावा नाईक यांनी केलाय. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी विनंतीही त्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.