शासकीय इतमामात सरबजीत यांच्यावर अंत्यसंस्कार

पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत सिंग यांच्यावरील अंत्यविधीं थोड्या वेळापूर्वीच पार पडला.

Updated: May 3, 2013, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भिखीवंडी
पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत सिंग यांच्यावरील अंत्यविधीं थोड्या वेळापूर्वीच पार पडला. शासकीय इतमामात त्यांच्या गावी भिखीविंड इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सरबजीत यांचं पार्थिव गुरुवारी अमृतसरला आणण्यात आलं.
भारताच्या पाकिस्तानातल्या उच्चायुक्तांच्या ताब्यात सरबजीतसिंग यांचा मृतदेह देण्यात आल्यानंतर एअरपोर्टवर पाकिस्तानच्या कस्टम्स अधिकाऱ्यांनी एनओसी मिळाली नसल्याचा तमाशा करुन, सरबजीत यांचं पार्थिव विमानतळावरच काही काळ रोखून ठेवलं. त्यानंतर काही काळानंतर हे पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं.

भारतात पार्थिव आणल्यानंतर पुन्हा एकदा पंजाबमधील पट्टीमधील रुग्णालयात या पार्थिवावर पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यानंतरच हे पार्थिव सरबजीतच्या कुटुंबीयांच्या हाती सोपवण्यात आलं. अंत्यसंस्कार करताना त्यांच्या कुटुंबीयांनी अतीव दु:खाने अक्षरश: टाहो फोडला.