नवी दिल्ली : समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय.
मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव दोघेही आपलाच पक्ष खरा असा दावा करणार आहेत. त्यामुळे सायकलच्या निवडणूक चिन्हावर दोन्ही गट दावा सांगणार आहेत.
काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुलायम सिंहांना संरक्षक तर अखिलेश यादवांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यात आलं. त्याचप्रमाणे शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं.
शिवाय अमर सिंहांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावर आज सकाळी शिवपाल यादवांनी स्वतः राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 5 जानेवारीला बोलावली. पण मुलायम सिंहांनी तातडीनं या बैठकीला स्थगिती दिली. त्यामुळे आता मुलायम आणि अखिलेश यांच्या या यादवीत तासगणिक नवनविन पैलू समोर येऊ लागले आहेत.
याच घ़डामोड़ी होत असताना अमर सिंह लंडनहून दिल्लीत परत आले आहेत आणि त्यांनी आपण मुलायम सिंहांसोबत असल्याचं आज सकाळी विमानतळावर परतल्यावर म्हटलं आहे.