लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी काढणं एका युवकाला महागात पडलंय. त्याची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी झाली.
दबंग DM अशी ख्याती असलेल्या चंद्रकला चार दिवसांपूर्वी बुलंदशहरमधल्या एका गावात नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान सरपंचासोबत आलेल्या फराज नामक एका युवकानं त्यांच्यासोबत सेल्फी काढला.
याला चंद्रकला यांनी विरोध केला. त्यांच्या खासगी सचिवाने या युवकाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि सेल्फी डिलिट करायला सांगितला. मात्र फराजनं त्यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. आता फराजला माफ केल्याचं चंद्रकला सांगत असल्या तरी त्याला सध्या १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलंय.
त्याच वेळी मी अधिकारी असले, तरी महिलाही आहे. माझ्यासोबत फोटो घ्यायचा असेल, तर संमती घ्यायलाच हवी, हे लोकांनीही समजून घेतलं पाहिजे असं आवाहन चंद्रकला यांनी केलंय.