www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने अनपेक्षितरित्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली आहे. रघुराम राजन यांनी आरबीआयच्या गर्व्हनरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिलेच तिमाही पतधोरण आढावा जाहीर करताना बाजारातील अनेक धुरिणींना आश्चर्याचा धक्का दिला. रेपो रेटमध्ये वाढ केली असली तरी, सीआरआरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
रिझर्व्ह बॅंकने रोख राखीव प्रमाण चार टक्के कायम ठेवले आहे. बँकासाठीचा कर्ज दर मात्र ०. ७५ टक्क्यांनी घटवून ९.५ टक्के केला आहे. रेपो रेटच्या व्याजदरात वाढ करण्याचे आरबीआयने समर्थन केले आहे. वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
आरबीआयचे पतधोरण जाहीर होताच शेअर बाजारात ५०० अंकांनी घसरण झाली. घसरलेला विकास दर, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याजदर कपातीची अपेक्षा केली जात होती. मात्र आरबीआयने महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली आहे.
दरम्यान अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वर्षभरापासून उभारी येत आहे. ८५ अब्ज डॉलर्स इतक्या बाँडखरेदीबाबतच जैसे थे धोरण अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने कायम राखलीय त्यामुळे भारताला दिलासा मिळालाय. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम गेल्या दोन दिवसात रूपया आणि सेन्सेक्सच्या स्थितीवरूनही पाहायला मिळालाय. त्याचाही परिणाम आज रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ