नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते राज बब्बर यांनी पुन्हा एकदा तोंड उघडून नको तो वाद ओढावून घेतलाय.
मोदी सरकारच्या भूमि अधिग्रहण कायद्याविरोधात काँग्रेसनं बुधवारी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन केलं. या आंदोलनात राज बब्बर, पीएल पूनिया आणि श्रीप्रकाश जयस्वाल यांच्यासहीत अनेक नेत्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यविषयी बोलताना राज बब्बर यांची जीभ घसरली.... आणि त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला. काँग्रेसच्या 'जमीन वापसी आंदोलना'त बोलताना स्टेजवरून राज बब्बर म्हणाले 'नरेंद्र मोदीला शेतकऱ्यांची जमीन ४.५ करोडमध्ये त्याचा सूट खरेदी करणाऱ्या लोकांना गिफ्ट करायचीय. मला विचारायचंय, नरेंद्र दामोदरदास मोदीला की तुला काय माहीत आहे... तुला केवळ कॉर्पोरेटर्सला आपल्या सूटसाठी ४.५ करोडोंची बोली लावयचं माहीतेय... इथं ते शेतकरी बसलेत ज्यांची मुलं सीमेवर तैनात आहे... मोदी तुला काय माहीत आहे?' असं म्हणत असताना राज बब्बर यांचा तोल गेलेला पाहायला मिळाला.
राज बब्बर पहिल्यांदाच काही अशा वाचाळ पद्धतीनं बोलताना दिसलेले नाहीत... याआधीही, 'मुंबईत जेवणासाठी बारा रुपये पुष्कळ आहेत' अशी वाचाळ बडबड करून ते वादात अडकले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.