www.24taas.com, नव दिल्ली
जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते. पण गेल्या काही वर्षांत नितीश कुमार आणि मोदींमधला संघर्ष इतका वाढत गेला की आता नितीशकुमार मोदींची सावलीसुद्धा जवळ येऊ देत नाहीत.
नितीश कुमार आणि भाजपची सोळा वर्षांची दोस्ती....पण जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींचा विषय निघतो, त्यावेळी नितीश कुमारांचा संताप होतो. मोदींना पाठिंबा दिल्यामुळे बिहारची गणितं चुकतील, असा नितीश कुमारांचा अंदाज आहे. बिहारमध्ये साडे सोळा टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम आहेत. त्यापैकी 80 टक्के हा मागास मुस्लीम वर्ग आहे. मोदींशी जवळीक साधली तर या वर्गाची मतं हातची जातील आणि मुस्लिम-यादव समीकरणाची मदत घेत लालू पुन्हा बिहारवर राज्य करतील, अशी भीती नितीशकुमारांना वाटत आहे.
आतापर्यंत मोदींची सावलीही आपल्याला चालत नाही, हे नितीश कुमारांनी वेळोवेळी दाखवून दिलंय. कोसी नदीला पूर आल्यानंतर मोदींनी दिलेला मदतीचा चेक नितीशकुमारांनी परत केला. नितीशकुमारांनी बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठीही मोदींना येऊ दिलं नाही. एनडीएच्या रॅलीमध्ये मोदींबरोबर एकाच मंचावर येण्यासाठीही नितीशकुमार राजी झाले नाहीत. इतकंच काय तर राष्ट्रीय विकास परिषदेत मोदींबरोबर एका फोटोमध्येही यायची नितीशकुमारांची इच्छा नव्हती.
मोदींचा विरोध करणा-या नितीशकुमारांवर टीकाही होत आहे. 2002 साली गोधरा कांडावेळी नितीशकुमार रेल्वे मंत्री होते, मग ते त्यावेळी सरकारमधून बाहेर का पडले नाहीत, असा सवालही विचारला जातो. इतकंच नाही, तर मोदींना सतत विरोध करुन नितीशकुमारांनीच मोदींचं राजकारणातलं वजन वाढवल्याचीही चर्चा आहे.