www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.
सोनियांच्या जावयाला दिल्या जाणाऱ्या स्पेशल सोई-सुविधांवरवरून गेल्या अनेक दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. केंद्रानं ही रॉबर्ट वडेरा यांना मिळणारी ही ‘स्पेशल वागणूक’ काढून घेण्याचे संकेतही दिले होते. पण, केंद्रानं काही पाऊल उचलण्याआधीच प्रियांका गांधी यांनी स्वत: ‘स्पेशल प्रोटक्शन ग्रुप’ला (एसपीजी) एक पत्र लिहून आपली आणि आपल्या कुटुंबीयांना दिली जाणारी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशा आशयाचं एक पत्र लिहिलं... ‘एसपीजीचे माजी प्रमुख आणि दिल्ली पोलिसांनी जोर दिल्यानंतर वडेरा यांचा समावेश या सूचीत करण्यात आला होता. यासाठी आमच्यापैंकी कुणीही मागणी केली नव्हती... सुरक्षा प्रदान केली गेल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती मिळाली’ असं प्रियांका यांनी या पत्रात म्हटलं होतं.
प्रियांका गांधी यांनी लिहिलेल्या या पत्राबद्दल गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सुरक्षा कुणाच्याही मर्जीवर अवलंबून देता येता नाही, असं उत्तर दिलं. रिजिजू यांनी प्रियांका यांचा नामोल्लेख टाळत ‘सुरक्षासंबंधी मुद्द्यांचं कुणीही राजकारण करता कामा नये... याबद्दलचे सगळे निर्णय सुरक्षा एजन्सीवर सोडला जाणं, हेच उत्तम ठरेल’ असं म्हटलं.
प्रियांका यांच्या पत्राबद्दल बोलताना रिजिजू म्हणाले, ‘प्रियांका यांचं हे पाऊल योग्य नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना सुरक्षा मिळत आलीय. आताच त्या या मुद्द्याचं का भांडवल करत आहे. हा मुद्दा कुणाच्याही मर्जीवर किंवा सुरक्षेवर आधारित नसतो’.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.