नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल शौर्य पदकासाठी महाराष्ट्रातील चार मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यातील गौरव कवडूजी सहस्त्रबुद्धे या नागपूर येथील विद्यार्थ्याला मरणोपांत शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्यानं बुडत असलेल्या चार मुलांचा जीव वाचवला होता. त्याशिवाय मुंबईचा मोहीत दळवी, निलेश भिल आणि वैभव घांगरे यांनीही पूरामध्ये इतर मुलांना वाचविल्यामुळे त्यांना हे पुरस्कार देण्यात आले.
महाराष्ट्रातल्या ४ बालविरांचा पंतप्रधानांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. या मुलांच्या शौर्यकथाही थक्क करणाऱ्या आहेत.
गरीब घरात जन्माला आलेल्या एका मुलाला, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आपला जीव धोक्यात घालून एखाद्याला वाचवण्याची प्रेरणा कुठून येत असेल? मुक्ताईनगरच्या निलेश भिल या बालवीराची ही यशोगाथा...
निलेश भिल. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरच्या कोथळी गाव शिवारात एका कुडाच्या झोपडीत राहणारा. चौथीत शिकणाऱ्या निलेशची शौर्यगाथा अंगावर शहारा आणणारी...
३० ऑगस्ट २०१४ रोजी घडलेली ही घटना. बुलडाणा जिल्ह्यातून घोगले कुटुंबीय मुक्ताईच्या दर्शनासाठी इथं आलं होतं. पूर्णा नदीकाठी फिरत असताना या कुटुंबातला ११ वर्षांचा भागवत पाय घसरून पडला. त्याच्या आईनं आरडाओरडा सुरू केला. मात्र कुटुंबातल्या कुणालाच पोहता येत नसल्यानं भागवतला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेण्याची हिंमत कुणीच दाखवली नाही...
त्याच वेळी अवघ्या १० वर्षांचा निलेश मुक्ताई मंदिराबाहेर जेवत होता. गोंगाट ऐकून त्यानं पान बाजूला सारलं. नदीच्या दिशेनं धाव घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावला पूर्णेच्या पात्रात उडी घेतली. त्यानं भागवतला सुखरूप बाहेर काढलं. भागवतच्या आईच्या जागेवर आपल्याला आपलीच आई दिसली, म्हणून मी विचार न करता पाण्यात उडी घेतल्याचं निलेश सांगतो...
निलेशचे आई वडील मोलमजुरी करतात. जंगलात वास्तव्य असल्यामुळे पोहणं नैसर्गिक असलं तरी एखाद्याला वाचवण्यासाठी उडी घेण्याचं धाडस अंगी हवंच. त्याच्या या अतुलनीय पराक्रमाचा त्याच्या आईला आणि त्याच्या जिल्हा परिषद शाळेला रास्त अभिमान आहे...
भविष्यात काय व्हायचंय, यावर निलेशचं उत्तर आहे राजकारणात जायचंय. मंत्री बनायचंय... देशाला पुढे न्यायचंय. दुसऱ्यासाठी स्वतःला प्रवाहात झोकून देणाऱ्या नेत्यांचीच आज देशाला गरज आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीला शुभेच्छा...
असा हा आहे दुसरा बालवीर
नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धेनं आपल्या प्राणांची आहुती देऊन चौघांचे प्राण वाचवलेत. त्याला यासाठी बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्याच्या आईवडिलांच्या आणि मित्रांच्या एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू आहे.
घटना नागपूरमधली. तारीख ३ जून २०१४... १४ ते १७ वयोगटातली चार मुलं या प्रसिद्ध अंबाझरी तलावाजवळ खेळत होती.. यातल्या एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तीन मित्रांनीही पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज कुणालाही नव्हता. त्यामुळे चौघंही बुडू लागले...
त्याच वेळी गौरव सहस्त्रबुद्धे हा अवघ्या १५ वर्षांचा मुलगा तिथून जात होता. हा प्रकार बघताच त्यानं क्षणाचाही विलंब न लावता थेट पाण्यात उडी घेतली. एक -एक करून चौघांनाही बाहेर काढलं. मात्र शेवटच्या मुलाला बाहेर काढेपर्यंत गौरवचा दम सुटला. चौथ्या मुलाला काठावर पोहोचवल्यावर स्वतः बाहेर येण्याचं त्राण गौरवमध्ये राहिलं नाही. अखेर त्याला याच तलावात जलसमाधी मिळाली...
या अद्वितीय शौर्याबद्दल गौरवला मरणोपरान्त शौर्य पुरस्कार बहाल केलाय. आपल्या बाळानं दाखवलेल्या या अतुलनीय धाडसाचं त्याच्या आईवडिलांना कौतूक आहे.. मात्र या धाडसापोटी पोटचा गोळा गमावल्याचं दुःखही...
स्वतःचा जीव गमावूनही दुसऱ्याला मदत करण्याची ही उर्मी इतक्या बालवयात दिसणं तसं कठीणच... म्हणूनच खरंतर गौरवला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणं हा त्या पुरस्काराचाच गौरव म्हणायचा...