अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एका रेडिओ जॉकीच्या पत्नीनं दहाव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलंय. मात्र तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या? याबद्दल तपास सुरू आहे.
अहमदाबादच्या श्यामल भागात ही घटना घडलीय. भूमि पांचाल असं या विवाहितेचं नाव आहे. तिचा पती कुणाल देसाई हा एक रेडिओ जॉकी आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास सचिन टॉवरच्या खाली भूमि रक्तबंबाळ अवस्थेत आढळली.
मृत्यूपूर्वी आपला मित्र मितेश सोनी याला भूमिनं एक एसएमएस पाठवला होता. 'सचिन टॉवरवर आत्महत्या' असं या एसएमएसमध्ये तिनं म्हटलंय. त्यानंतर तातडीनं मितेशही घटनास्थळी दाखल झाला होता. पण, एव्हाना उशीर झाला होता.
भूमिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या भूमि हिला रेडिओच्या एका स्पर्धेत जिंकल्यानंतर दुबईला जाण्याची संधी मिळाली होती. इथंच तिची आणि कुणालची ओळख झाली. दोन महिन्यांपूर्वीच भूमि-कुणालचा विवाह झाला होता.