नवी दिल्ली : संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आप' खासदार भगवंत मान यांना पिण्यासाठी दिले. दिल्लीतील मुख्यमंत्री सचिवालयात सीबीआयने मारलेल्या छाप्यानंतर 'आप' खासदार आक्रमक झालेत. त्यावेळी भगवंत मान घोषणा देत होते. त्यांना यावेळी अस्वस्थ वाटू लागल्याने मोदींनी त्यांना पाणी दिले.
सीबीआयने मंगळवारी दिल्ली सरकारच्या सचिवालयातील कार्यालयावर मारलेल्या छाप्या विरोधात लोकसभेत 'आप'चे खासदार भगवंत मान जोरदार घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ते लोकसभा सचिवांच्या टेबलाजवळ पाण्याचा ग्लास शोधू लागले. मोदी तिथे जवळच बसले होते. त्यांनी लगेच आपल्यासमोरच्या ग्लासातील पाणी भगवंत मान यांना पिण्यासाठी दिले.
मान यांनीही लगेच त्या ग्लासातील पाणी प्यायले. मान यांनी ग्लास खाली ठेवण्यापूर्वी मोदींकडे पाहिले आणि दोघांनी स्मितहास्य केले. मोदींच्या या कृतीचे लोकसभेतील भाजप खासदारांनी बाके वाजवून कौतुक केले. मान यांनी त्यानंतर पुन्हा सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.