www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले. गंगा-दामोदर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांनी तब्बल चार तास विद्यार्थीनी आणि शिक्षिकांचा छळ केला.
पाटण्यात झालेल्या पर्यावरण शिबिरात सहभागी होऊन ९३ विद्यार्थिनी आणि तीन शिक्षिका परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. धनबादला आणि झारखंडमधील दिगवादी येथे जाण्यासाठी गंगा-दामोदर एक्स्प्रेसमध्ये त्यांनी ‘रिझर्व्हेशन’ ही करुन ठेवले होते.
शनिवारी सकाळी १० वाजता त्या मुली, शिक्षिका पाटणा स्थानकात गाडीत शिरल्या. ‘रिझर्व्हेशन’ केले असल्याने त्या निश्चिंत होत्या. पण त्यांची सर्व आसने रेल्वे भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांनी बळकावली होती. त्यांनी त्या मुलींना हक्काची बसण्याची जागा देण्यास नकार तर दिलाच, पण दुपारी पावणे बारा वाजता गाडीने पाटणा स्टेशन सोडताच त्या तरुणांमधील ‘पशू’ जागा झाला.
त्या तरुणांनी विद्यार्थिनींची छेडछाड, सतावणूक सुरु केली. शेवटी त्यांनी मुलींच्या अंगचटीला जाण्यापर्यंत मजल मारली. मुलींचा हा छळ तब्बल चार तास सुरु होता. मुलींना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षिकांना त्या तरुणांनी मारहाण केली. संध्याकाळी ४ वाजता ते सारे तरुण कोडेरमा स्थानकात उतरून गेल्यानंतच त्या मुलींची छळातून सुटका झाली. कार्मेल स्कूलच्या विद्द्यार्थिनी आणि शिक्षिकांनी रेल्वे गाडीत झालेल्या छळाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.