www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसून सोमवारी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत पाच भारतीय जवान शहीद झाले असून, पाकच्या या नापाक कृत्याबद्दल भारतात संतापाची लाट उसळलीय.
रमझानच्या पवित्र महिन्यातच पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले नापाक इरादे स्पष्ट केलेत. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जवळपास २०-२५ पाकिस्तानी सैनिकांच्या तुकडीने एलओसी ओलांडून काश्मीरच्या पूंछ भागात भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यांच्यासोबत काही दहशतवादीही होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यावेळी भारतीय हद्दीत सरला पोस्टजवळ गस्त घालत असलेल्या २१ बिहार युनिटवर पाक सैन्याने फायरिंग करत हल्ला चढवला. या हल्ल्यात भारतीय सैन्याचा एक सुभेदार आणि चार जवान शहीद झाले.
पाक सैन्याच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळलीय. केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केलाय. अशा घटनांमुळे भारत-पाक संबंधांना खीळ बसू शकते, असे त्यांनी स्पष्ट केलंय.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या घटनेबद्दल ट्विट करून तीव्र शोक व्यक्त केलाय. एलओसीवर पाच जवान शहीद झाल्याचं काल सकाळी कळलं. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशा घटनांमुळे पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असं ट्विट त्यांनी केलंय.
यापूर्वीही ८ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैन्याने पूंछ भागातच भारतीय सैनिकाचा शिरच्छेद केला होता तसेच आणखी एका सैनिकाला ठार केले होते. पाकच्या या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यही सतर्क झालंय. भारतीय लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग हे परिस्थितीचा आढावा घेत आहेत, अशी माहिती सैन्यातील सूत्रांनी दिली.
या घटनेमुळं भारत-पाक वाटाघाटी प्रक्रियेला खीळ बसण्याची शक्यता आहे. युनो अधिवेशनाच्या निमित्ताने पुढील महिन्यात न्यूयॉर्कमध्ये भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे. त्या भेटीवर या हल्ल्याच्या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.